कोरोना एक संकट आहे, त्याचा सामना सामूहिकपणे केलाच पाहिजे. काल दि. ५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवा लावण्याचा संदेश दिला. एक दिवा लावून काय फरक पडतो, हा नरेंद्र मोदींचा 'इव्हेंट' आहे असा सूर अनेकांनी लावला. काही जणांनी गरीब उपाशी मरतायत; तेव्हा दिव्याच्या तेलाचे एवढे रुपये, गरिबांना दिले पाहिजेत असा कळवळाही व्यक्त केला.
काल रात्री तर काळाच्या काळजावर कोरले जावे असे अद्भुत दृश्य जगाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन देशातील जनतेने अक्षरशः दिवाळीत परावर्तीत केले. उद्योगपती रतन टाटा आणि झोपडीच्या दारात उभी असलेली चिमुरडी दोघेही मोदी यांच्या आवाहनाला धावून आले. रतन टाटा असो की झोपडीच्या दारातील 'पणती' असो दोन्हींचा प्रकाश समान होता. मोदी यांच्या एका आवाहनावर 'राजा आणि रंक' एकाच पातळीवर आले. कोणाला ही मोदी भक्ती वाटेल, कोणाला मोदींचा इव्हेंट वाटेल. कोणाला काय वाटते, यावर राष्ट्र व धर्म यावरील निष्ठा कमी जास्त होणार नाहीत.
हिंदुस्तान एक अध्यात्मिक देश आहे. दगडात देव पाहणारा देवभोळा समाज आहे. प्रत्येक गोष्टीवर तर्क लावत नाही, विज्ञान आहे म्हणून धर्म नाकारत नाही. धर्म आहे म्हणून दुसऱ्या धर्मावर धर्मवेडाचे ओरखडे मारत नाही. दुःखाने उन्मळून पडत नाही, सुखाने हुरळून जात नाही. कोरोना महासंकट आहे, म्हणून धीर सोडला नाही. नरेंद्र मोदी या माणसावर देशाने विश्वास दाखविला. रतन टाटांनी शक्य आहे म्हणून कोट्यवधी रुपये देशाला दिले, त्याच वेळी उद्या भाजीला तेल मिळेल की नाही, याचीही काळजी झोपडीतल्या गरिबांनी केली नाही. एका आवाहनावर दोघांनी आपली झोळी रिकामी केली. आपल्या नेत्यावर असलेला विश्वास पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. यालाच म्हणतात 'मोदी है तो मुमकींन है'